देशाचा नागरिक या नात्याने आपला राष्ट्रध्वज म्हणजेच तिरंग्याचं महत्त्व आणि इतिहास याविषयी जागरुक असले पाहिजे. राष्ट्रध्वज फडकावण्यापूर्वी प्रोटोकॉल जाणून घेतले पाहिजेत आणि त्याचे पालन केले पाहिजे. ध्वज उलटा किंवा निष्काळजीपणे फडकवणे हा अनादर आहे. ध्वज जमिनीला स्पर्श करत असलेल्या स्थितीत फडकवणे म्हणजे राष्ट्रध्वजाचा अपमान आहे. राष्ट्रध्वज कुठेही फेकू नका किंवा ध्वज फाडणे म्हणजे त्याचा अनादर आहे. ध्वजारोहण करताना ध्वज कोणत्याही प्रकारे फाटणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. चुकूनही फाटला तरी त्याचा अनादर होता कामा नये. घरामध्ये किंवा ऑफीसमध्ये ध्वज फडकवताना हा ध्वज मोकळ्या जागेवर लावावा आणि तिरंग्याच्या वर दुसरा कोणताही ध्वज नसावा. राष्ट्रध्वजातील प्रत्येक रंगाला विशेष महत्त्व आहे, त्यामुळे ध्वजावरील भगवा, पांढरा आणि हिरवा अशा रंगाच्या चुकीच्या छटा वापरणे अयोग्य आहे. तिरंग्याचा अयोग्य पद्धतीने वापर केलेला पोशाख परिधान करणे हाही राष्ट्रध्वजाचा अपमान आहे. राष्ट्रध्वजावर लिहिणे किंवा रंगकाम करणे टाळा. यामुळे राष्ट्रध्वजाचा अनादर होतो. वाहनांवर तिरंगा घेऊन फिरणे हेही बेकायदेशीर आहे. भारतीय ध्वज संहितेनुसार, वाहनांवर फक्त 225x150 मिमी आकाराचे ध्वज वापरता येतात. यासोबतच सामान्य नागरिक आपल्या गाडीवर तिरंगा लावू शकत नाही. ध्वज लावण्याचा विशेष अधिकार काही घटनात्मक मान्यवरांनाच आहे.