'सा रे ग म प' लिटल चॅम्प्स'च्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या कार्तिकी गायकवाडचा मोठा चाहतावर्ग आहे. काही दिवसांपूर्वी लाडक्या कार्तिकीने रोनित पिसेसोबत लग्न करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. 'अपोझिट पोल्स अट्रॅक्ट्स इच अदर' असं म्हणत कार्तिकी रोनितसोबत लग्नबंधनात अडकली आहे. कार्तिकी गायकवाड आणि रोनित पिसेच्या लग्नाची स्टोरी खूपच रंजक आहे. कार्तिकीचे वडील आणि रोनितची आई एकमेकांना आधीपासूनच ओळखत होते. त्यांच्यात चांगली मैत्री होती. त्यामुळे एकेदिवशी रोनितच्या आईने कार्तिकीच्या वडिलांना रोनितची पत्रिका दाखवली आणि विचारलं की तुमच्या ओळखीत कोणी मुलगी आहे का? रोनितच्या आईच्या प्रश्नानंतर कार्तिकीच्या वडिलांच्या मनात लेकीच्या लग्नाबाबत प्रश्न उपस्थित झाला. अखेर काही दिवसांनी त्यांनी रोनितसाठी कार्तिकीचं नाव सुचवलं आणि रोनित आणि कार्तिकीनेदेखील एकमेकांना होकार दिला. रोनितची आई आणि कार्तिकीचे वडिल यांच्यात मैत्रीचं नातं असलं तरी कार्तिकी आणि रोनितची भेट मात्र लग्न ठरवण्यावेळीच झाली होती. कार्तिकीचा पती रोनित पिसे हा मॅकेनिकल इंजिनिअर आहे.