काही ठिकाणी पाऊस पडतो काही ठिकाणी बर्फवृष्टी होते. पण या जगात अशीही एक जागा आहे, जिथे चक्क हिऱ्यांचा पाऊस पडतो. हो हे ऐकून नवलं वाटणं स्वाभाविक आहे पण हे खरं आहे. आपल्या सूर्यमालेमध्ये असे काही ग्रह आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही. हे ग्रह इतर ग्रहांपेक्षा खूप वेगळे आणि खास आहेत. या ग्रहांचे हवामानही इतर ग्रहांपेक्षा खूप वेगळे आहे. हे वेगळे ग्रह म्हणजे नेपच्यून आणि यूरेनस. नेपच्यून ग्रह पृथ्वीपेक्षा आकाराने सुमारे 15 पट मोठा आहे. तसेच युरेनस हा ग्रह पृथ्वीच्या आकारापेक्षा सुमारे 17 पट मोठा आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या ग्रहांवर हिऱ्यांचा पाऊस पडतो. शास्त्रज्ञांच्या मते, या ग्रहांवर वातावरणाचा दबाव खूप जास्त आहे. नेपच्यून आणि यूरेनस या ग्रहांवर मिथेन वायू बर्फासारखा गोठून राहतो आणि वारा सुटला की याचे ढग तयार होऊन तो पसरतो. या ग्रहांचे पृष्ठभाग पूर्णपणे सपाट आहेत त्यामुळे येथे वारे अगदी सुस्साट म्हणजे 1500 मैल/तास वेगाने वाहतात. येथील वातावरणात घनरुप कार्बनचे प्रमाण भरपूर आहे, त्यामुळे येथे हिऱ्यांचा पाऊस पडतो. पण हे हिरे कुणालाही मिळू शकत नाही. कारण हा ग्रह पृथ्वीपासून फार दूर आहे. तेथील वातावरणही अतिशय थंड आहे.