'ब्रेक द बायस' अर्थात समाजातील स्त्री-पुरुषांमधील भेदभाव मिटावा, असा संदेश जनसामान्यापर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीने नागपूर जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या महिला मॅरेथॉनला चांगला प्रतिसाद मिळाला.

कस्तुरचंद पार्क मैदानातून सुरू झालेल्या पाच किलोमीटर, तीन किलोमीटर आणि दोन किलोमीटर अंतराच्या शर्यतीत हजारो महिला सहभागी झाल्या.

नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त प्राजक्ता वर्मा लवंगारे आणि नागपूरचे जिल्हाधिकारी आर विमला यांनी या मॅराथॉनसाठी विशेष प्रयत्न घेतले.



या मॅरेथॉनचे माध्यमातून अनेक वर्षांमध्ये पहिल्यांदाच क्रीडा प्रकारात सहभागी होण्याची संधी मिळाली असे मत काही महिलांनी व्यक्त केले.

तर काहींनी थेट शालेय जीवनानंतर पहिल्यांदाच शर्यतीत धावण्याचा मनमुराद आनंद लुटल्याची भावना व्यक्त केली.

काही महिला तर आपल्या लेकींसह या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्या. आम्ही मायलेकी रोज सकाळी एकत्रित जॉगिंग करतो. मात्र, शर्यतीत एकत्रित धावण्याचा आनंदच वेगळा अशी भावनाही काहींनी व्यक्त केली.



कोरोनाच्या दोन वर्षांच्या बंधनानंतर अशा आयोजनाच्या माध्यमातून घराबाहेर पडण्याची आणि मैत्रिणींना भेटण्याची संधीही या मॅराथॉनने उपलब्ध करून दिल्याची भावना काही महिलांनी व्यक्त केली.

समाजात व्याप्त स्त्री पुरुष भेदभाव त्यागून दोघांना समसमान संधी उपलब्ध व्हावी अशा विविध उद्देशाने ही महिला मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती.