राज्यात नुकताच आषाढी एकादशीचा सोहळा पार पडला. या निमित्ताने सेलिब्रिटींनीही विठुरायाचं दर्शन घेतलं. आषाढी एकादशी निमित्ताने बिग बी अमिताभ बच्चन यांनी मुंबईच्या सायन विठ्ठल मंदिरामध्ये दर्शनासाठी हजेरी लावली. या दरम्यानचे फोटो अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून शेअर केले आहेत. यावेळी अमिताभ बच्चन यांनी तब्बल अर्धा तास मंदिरात विठोबाची पूजा आणि आरती केली. तसेच, विठुरायाच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांनी विठोबाचा आशीर्वादही घेतला. अमिताभ बच्चन दरवर्षी सायनच्या या विठ्ठल मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात. मंदिर प्रशासनाकडून अमिताभ बच्चन यांचा सत्कारही करण्यात आला.