इंग्लंडचा स्टार ऑलराऊंडर बेन स्टोक्सने नुकतीच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. अधिकृत ट्वीटर हँडलवरुन एक भावूक पोस्ट लिहित त्याने ही माहिती दिली. दरम्यान या पोस्टमध्ये त्याने निवृत्ती घेण्यामागील कारणही सांगितले. तिन्ही क्रिकेट प्रकारात संघाला हवं तसं सहकार्य देत नसल्याने हा निर्णय घेतल्याचं तो म्हणाला. यामुळे आता उर्वरीत कसोटी आणि टी20 क्रिकेटमध्ये अधिक चांगला खेळ करु शकतो असंही त्याने सांगितलं. स्टोक्स सध्या कसोटी संघाचा कर्णधार असून यंदा होणाऱ्या टी20 विश्वचषक संघातही तो नक्कीच संघात असेल. स्टोक्स त्याचा अखेरचा सामना 19 जुलै रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डरहम येथे खेळणार आहे. निवृत्ती घेताना बेनने कर्णधार जोस बटलरसह संपूर्ण इंग्लंड क्रिकेटचे आभार मानले. स्टोक्सने संघाला विश्वचषक जिंकवून देण्यात मोलाची कामगिरी केली. त्याने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.