हरितालिका व्रत हे सौभाग्य देणारं आहे. चांगला नवरा मिळावा, वैवाहिक जीवन आनंदी राहावं म्हणून हे व्रत केलं जातं. पुराण काळापासून भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला हरितालिका व्रत पाळलं जातं. हरितालिकेतचं व्रत शंकर-पार्वतीला समर्पित आहे. स्त्रियांसाठी हरितालिकेच्या व्रताचं मोठं महत्त्व आहे. हरितालिका व्रत कुमारिका, विवाहित स्त्रिया, याच्यासोबत विधवा स्त्रियाही करतात. हरितालिकेच्या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी अन्न आणि पाण्याशिवाय उपवास करतात. असं मानलं जातं की, शंकर-पार्वतीच्या कृपेने अविवाहित मुलींना योग्य वर मिळतो. अविवाहित मुली चांगला वर मिळावा, म्हणून या दिवशी उपवास करतात. तर विधवा स्त्रिया शिव शंकराची आराधना म्हणून हरितालिकेचं व्रत करतात.