मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने अमृता सुभाषनं वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतीच चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे. अमृतानं सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टला कमेंट करुन अनेक सेलिब्रिटी आणि अमृताचे चाहते तिला शुभेच्छा देत आहेत. अमृतानं सोशल मीडिया एका प्रेग्नन्सी किटचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत अमृतानं लिहिलं, 'ओह, द वंडर बिगिन्स' अमृताच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. अमृता सुभाष आणि संदेश कुलकर्णी हे आई-बाबा होणार आहेत. या पोस्टला अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करुन अमृता आणि संदेश कुलकर्णी यांना शुभेच्छा दिल्यात. अमृता आणि संदेश यांनी 2003 मध्ये लग्नगाठ बांधली. 'पुनःश्च हनिमून' या नाटकात दोघांच्याही प्रमुख भूमिका असून प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अमृतानं वळू, श्वास, विहीर, हापूस,किल्ला या मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'गल्ली बॉय' या हिंदी चित्रपटामुळे अमृताला विशेष लोकप्रियता मिळाली. 'सेक्रेड गेम्स-2', 'बॉम्बे बेगम्स' आणि 'सास, बहू आचार प्रा. ली' या वेब सीरिजमधील अमृताच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं आहे.