आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिशिंगणापूर येथे श्री शनैश्वर मूर्तीचे दर्शन घेत पूजा केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अहमदनगर येथील शनिशिंगणापूर मंदिरात चौथऱ्यावर जाऊन शनि देवाचं दर्शन घेतलं. शनि देवाचं दर्शन घेताना त्यांनी तेलाभिषेक केला आणि विधिवत पूजा केली. यावेळी राष्ट्रपतींची कन्या देखील शनिदेवाचे दर्शन घेण्यासाठी आल्या होत्या. महिलांसाठी प्रवेशबंदी असलेल्या शनिशिंगणापूरमधील चौथऱ्यावर जाऊन राष्ट्रपती मुर्मू यांनी शनीदेवाला अभिषेक केला. शनिशिंगणापूरच्या इतिहासात देशाच्या राष्ट्रपती प्रथमच दर्शनासाठी आल्या. राष्ट्रपती मुर्मू यांनी पूजेनंतर साध्या पदार्थांचा समावेश असलेला महाप्रसाद मंदिराच्या कार्यालयात घेतला. या महाप्रसादात करडीची भाजी, मोड आलेली मटकी, वरण-भात आणि साधी चपाती यांचा समावेश होता. राज्यपाल रमेश बैस, अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि कृषी मंत्री दादा भुसे हे मंदिरात उपस्थित होते. तसेच शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे आणि अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील देखील येथे उपस्थित होते.