सरकारने कायदे मागे घेतल्याचा आनंदोत्सव साजरा करत आंदोनस्थळावरून शेतकरी आपापल्या घरी परतत आहेत. आंदोलन संपवून शेतकरी घरी चालल्यामुळे 378 दिवसांपासून जेवणाची सोय होत असलेल्या स्थानिकांना आता जेवणाची चिंता सतावत आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून आंदोलकांनी जेवणासाठी सिंघू सिमेवर लंगर सुरू केला होता. शनिवारी सकाळी झोपडपट्टीवासीयांसह मोठ्या संख्येने मुले आणि स्थानिक गरीबांनी शेतकऱ्यांच्या लंगरमध्ये शेवटचा नाश्ता केला. संयुक्त किसान मोर्चासह (SKM)40 हून अधिक शेतकरी संघटना कृषी कायद्यांविरोधात आंदोलनासाठी एकत्र आल्या होत्या. केंद्राने कृषी कायदे मागे घेतल्यानंतर, गुरुवारी 378 दिवस चाललेले आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आणि आज आंदोलनस्थळावरून शेतकरी आपापल्या घरी परतले. अनेक बेघर लोक शेतकऱ्यांनी उभारलेल्या तात्पुरत्या तंबूत राहत होते. आंदोलनातून परताना शेतकऱ्यांनी या भंगार विक्रेत्यांना आपले ब्लँकेट, लोकरीचे कपडे, इतर कपडे, पैसे आणि दैनंदिन वापराच्या काही वस्तू दिल्या.