भारताचा जगज्जेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद आज आपला 52 वा वाढदिवस साजरा करत आहे. पाच वेळा विश्वविजेता ठरलेल्या विश्वनाथन आनंदवर वाढदिवसानिमित्ताने चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विश्वनाथन आनंदाचा जन्म 11 डिसेंबर 1969 रोजी तामिळनाडू येथील मयिलाडूथराई या शहरात झाला. विश्वनाथन आनंद हा एक अद्भुत प्रतिभेचा बुद्धिबळपटू आहे. चाणाक्ष खेळाडू म्हणून त्याची जगभरात ओळख आहे. बुध्दिबल प्रशिक्षण असलेल्या आईने विश्वनाथन आनंदला अवघ्या 6 व्या वर्षापासून बुद्धिबळाचे धडे दिले. विश्वनाथन आनंदच्या नावे अनेक विक्रम आहेत. 1983 मध्ये 9 पैकी 9 गुण घेत तो कनिष्ठ गटाचा राष्ट्रीय विजेता बनला. पंधराव्या वर्षी तो आंतरराष्ट्रीय मास्टर' बनला. हा विक्रम करणारा आशियातील तो एकमेव खेळाडू आहे. सोळाव्या वर्षीच म्हणजे 1986 मध्ये ‘राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा’ जिंकली.