‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगांवकर. या मालिकेत तिने ‘वहिनीसाहेब’ हे पात्र साकारले होते. मालिकेदरम्यान गर्भवती असल्याने धनश्रीने या मालिकेला अलविदा केला होता. आता धनश्री आई झाली असून, ती लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. नव्या मालिकेतून ती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवरील आगामी मालिका ‘तू चाल पुढं’मध्ये (Tu Chal Pudha) ती महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांना पाहायला मिळाला. या मालिकेची गोष्ट आहे एका गृहिणीने पाहिलेल्या मोठ्या स्वप्नांची. एकत्र कुटुंब असलेल्या या घरी अश्विनीला देखील त्यांच्या नवीन घरासाठी खारीचा वाटा देण्याची इच्छा असते, हे या प्रोमो मधून झळकते. या मालिकेत अभिनेत्री दीपा परब सोबतच ‘तुझ्यात जीव रंगला’मधील वाहिनीसाहेब म्हणजेच अभिनेत्री धनश्री काडगावकर देखील महत्त्वाची भूमिका साकारताना दिसतेय.