रायगड : नवी मुंबईतील तिघे अलिबागच्या समुद्रात बुडाले

रायगड : समुद्रात पोहण्यासाठी गेलेले तीन जण पाण्यात बुडाल्याची घटना अलिबागच्या नागाव समुद्रकिनाऱ्यावर घडली. बुडालेल्या तिघांपैकी दोन जणांचे मृतदेह शोधण्यात यश आलं आहे, तर एकाचा शोध सुरु आहे.

21 वर्षीय सुहाद सिद्दीकी आणि 20 वर्षीय आशिष रामणारायन मिश्रा यांचे मृतदेह सापडले आहेत. सायंकाळपर्यंत 20 वर्षीय चैतन्य किरण सुळे याचा शोध सुरु होता.

नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील 13 जणांचा एक ग्रुप शुक्रवारी अलिबाग येथे फिरायला आला. यावेळी अलिबाग तालुक्यातील नागाव येथील समुद्रकिनारी फिरत असताना रात्री आठ वाजताच्या सुमारास यातील काही तरुण हे समुदात पोहण्यासाठी गेले होते.

काही वेळाने इतर मित्र पाण्यातून बाहेर आले, तर तीन तरुण पाण्यात पोहत होते.  यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने हे तिघेही समुद्राच्या पाण्यात वाहून गेले.

घाबरलेल्या मित्रांनी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र रात्री उशिरा त्यांचा शोध घेणं कठीण झालं होतं. या घटनेची माहिती अलिबाग पोलिसांना देण्यात आली असता, सकाळी या बेपत्ता तरुणांचा शोध घेण्यात आला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola