पुणे : नागराज मंजुळेंमुळे पुणे विद्यापीठावर कारवाईची शक्यता
गेल्या १२० दिवसांपासून नागराज मंजुळेच्या आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणामुळे सावित्रीबाई फुले विद्यापीठाचं मैदान विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध नाही आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना हिंदी चित्रपटाच्या शूटिंगसाठी सेट उभारण्यासाठी मैदान भाड्याने दिलं. मात्र यामुळे विद्यापीठाच्या जागेचा कमर्शियल वापर झाल्यानं लिजच्या करारातल्या शर्तभंग झाल्याचा ठपका पुणे शहर तहसील कार्यालयानं ठेवला आहे. त्यामुळे विद्यापीठावर कारवाईही होऊ शकते. दरम्यान, संपूर्ण हिवाळ्यात मैदानावर सेट असल्याने विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान आणि लोकांना व्यायामासाठी जागा मिळाली नाही. त्यामुळे हक्काची जागा परत कधी मिळणार असा सवाल विद्यार्थी विचारत आहेत. नागराज मंजुळे फुटबॉलशी संबंधित विषयावर हिंदी चित्रपट काढत आहेत. त्यात महानायक अमिताभ बच्चन यांचीही भूमिका असणार आहे.