Vaccination: लसींचं पेटंट खुलं करण्याच्या मागणीला जो बायडन यांचं समर्थन, जागतिक लसीकरणाला मिळणार गती
वॉशिंग्टन : कोरोनाच्या महामारीत पेटंट आणि व्यापारातील गोपनियतेच्या अटी या सर्वच देशातील लसीकरणाच्या कार्यक्रमात अडथळा ठरत आहेत. कोरोनाच्या जागतिक संकटात अमेरिकेत बनलेल्या लसी आणि औषधांचे स्वामित्व अधिकार खुले करण्याला बायडेन प्रशासनाने पाठिंबा दिला आहे. तशा प्रकारची घोषणा ही बुधवारी करण्यात आली आहे. त्यामुळे आता अमेरिकेत तयार होणाऱ्या लसी या जगभरातील लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना बनवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोरोनाची महामारी हे एक जागतिक संकट आहे. त्यामुळे काही असामान्य निर्णय घेणं आवश्यक आहेत. बायडेन प्रशासन हे बौद्धिक संपदा अधिकारांचे समर्थन करते पण सध्याचा काळ पाहता ही महामारी संपवण्याला प्राधान्य दिलं पाहिजे. त्यामुळे आम्ही कोरोना लसीचे स्वामित्व अधिकार खुलं करण्याचा निर्णय घेत आहोत असं बायडेन प्रशासनाच्या ज्येष्ठ व्यापारी प्रतिनिधी कॅथरिन टाई यांनी आपल्या निवेदनात सांगितलं आहे.