Afghanistan : काबुल विमानतळावर अनागोंदी; चेंगराचेंगरीत सात अफगाणी नागरिकांचा मृत्यू
काबुल : अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी सत्ता हाती घेऊन आता एक आठवडा झाला आहे. या काळात देश सोडून जाण्यासाठी अनेक अफगाणी नागरिकांनी काबुल विमानतळावर मोठी गर्दी केली असून त्या ठिकाणी अनागोंदीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्या ठिकाणी झालेल्या चेंगराचेंगरीत सात अफगाणी नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती ब्रिटनच्या लष्कराने दिली आहे.
काबुल विमानतळावरचं वातावरण अजूनही तणावपूर्ण असून आपल्याकडून जे काही शक्य आहे ते आपण करत असल्याचं ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. गेल्या आठवड्यापासून देश सोडण्यासाठी अफगाणी नागरिकांनी काबुल विमानतळावर गर्दी केली आहे. अशातच हवेत गोळीबाराच्या अनेक घटना घडत आहेत. त्यामुळे या ठिकाणी अनागोंदीचे वातावरण निर्माण झालं असून त्यामुळे चेंगराचेंगरीची घटना घडत असल्याचं समोर आलं आहे. या ठिकाणी गोळीबार नेमकं कोणत्या ठिकाणाहून आणि कोणाकडून करण्यात येत आहे याची माहिती नाही.