Omar Abdullah Speech | नेव्ही अधिकाऱ्याच्या विधवेला काय उत्तर देऊ? मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला गहिवरले

श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी (Terrorist) हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यात अनेकांनी आपले स्वकीय गमावले असून नव्याने लग्न झालेल्या महिलांनी आपल्या डोळ्यादेखत पतीवर गोळ्या झाडल्याचं पाहिलं. या हल्ल्यानंतर देशभरात तीव्र संताप व्यक्त होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या हल्ल्यातील दहशतवाद्यांना सोडणार नाही, त्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल, असे म्हटले आहे. त्यातच, जम्मू काश्मीरमध्ये (Jammu kashmir) या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते. या अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला (Omar abdullah) यांनी काळजाला हात घालणारं भाषण केलं. केवळ हल्ल्याच्या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप 26 नागरिकांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदन व्यक्त करण्यासाठी आज आपण इथं आलोय, असेही अब्दुल्ला यांनी म्हटले.

उत्तर ते दक्षिण, पूर्व ते पश्चिमपर्यंत संपूर्ण देश या हल्ल्याने व्यथित झाला आहे. यापूर्वीही अनेक हल्ले झाले आहेत, अमरनाथ यात्रा, काश्मीरी पंडित, सरदार बस्तीया येथेही हल्ले झाले आहेत. मात्र, 21 वर्षानंतर एवढा मोठा हल्ला काश्मीरमध्ये झाल्याचे सांगताना मुख्यमंत्री भावूक झाले. मुख्यमंत्री, पर्यटनमंत्री या नात्याने आपण पर्यटकांना निमंत्रण दिले होते. आलेल्या पाहुण्यांना, पर्यटकांना सुखरुप येथून पाठविण्याची जबाबदारी माझी होती. पण, नाही पाठवू शकलो. माफी मागायला माझ्याकडे शब्द नाहीत. काय बोलू त्यांना, त्या लहान मुलांना, ज्यांनी आपल्या वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात पाहिलं. त्या नेव्ही ऑफिसरच्या विधवा पत्नीला काय बोलू, जिचं काही दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं, असे भावनिक उद्गार ओमर अब्दुल्लांनी सभागृहात काढले. यावेळी, उपस्थित सदस्यांना बाकही त्यांनी वाजवू दिले नाहीत, आज नको.. असे म्हणत बाक वाजवणाऱ्यांना त्यांनी थाबवलं. त्यांच्या या कृत्याने सभागृह स्तब्ध झालं होतं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola