Apple : ओमायक्रॉनमुळे अॅप्पलचं कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'चं आवाहन, देणार 1000 डॉलर्सचा बोनस.
कंपनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमसाठी देणार 1000 डॉलर्सचा बोनस.
अॅप्पल या कंपनीने कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याची मुदत मागे घेतली आहे.
करोनाचं संकट संपेल असं वाटत असताना नव्या व्हेरिएंटची धास्ती वाटू लागली आहे. ओमायक्रॉन या नव्या विषाणूमुळे पुन्हा एकदा संकटाचे काळे ढग दाटू लागले आहेत. त्यामुळे कार्यालयं आणि शाळा सुरु करण्याबाबत सावध पवित्रा घेतला जात आहे. आता अॅप्पल या कंपनीने कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याची मुदत मागे घेतली आहे. तसेच कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यासाठी १००० अमेरिकन डॉलर्सचा बोनस जाहीर करण्यात आला आहे. खरं तर, अॅप्पलचे सीईओ टिम कुक यांनी आधी सांगितले होते की, ऑक्टोबरमध्ये कर्मचार्यांसाठी कार्यालय उघडले जाईल. नंतर १ फेब्रुवारी २०२२ पर्यंत वाढविण्यात आला होता.
कंपनीने आठवडाभरापूर्वी कर्मचाऱ्यांना फेब्रुवारीपर्यंत कामावर येण्यास सांगितले होते. मात्र पुन्हा एकदा ही मुदत वाढवण्यात आली आहे. पुढील तारीख अद्याप ठरलेली नाही. करोनाचा उद्रेक पाहता अॅप्पलने तीन रिटेल स्टोअर्स देखील बंद केले आहेत. बंद करण्यात आलेले स्टोअर्स मियामी, मेरीलँड आणि ओटावा येथे आहेत. अॅप्पलने त्यांच्या यूएस स्टोअरमध्ये आता मास्क अनिवार्य केलं आहे. यापूर्वी ग्राहकांसाठी मास्क घालण्याचा आदेश काढून घेण्यात आला होता. मात्र आता पुन्हा हा नियम लागू केला आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, अमेरिकेतील जवळजवळ अर्ध्या अॅप्पल स्टोअरमध्ये ग्राहकांना मास्क घालण्याची आवश्यकता नव्हती. दुसरीकडे, अॅप्पलने म्हटले आहे की, ग्राहक आणि कर्मचार्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मास्क अनिवार्य आहे.
गेल्या वर्षी करोना व्हायरसच्या उद्रेक झाल्यानंतर अॅप्पलने आपल्या कर्मचार्यांना साथीच्या आजाराच्या वेळी घरी राहण्याचा सल्ला दिला होता. तसेच पहिली यूएस कंपनी ठरली होती. तसेच या वर्षी सप्टेंबरमध्ये कार्यालय सुरू करण्याच्या तयारीत होते. त्यानंतर, करोनाच्या वाढते रुग्ण पाहता कालावधी एक महिना म्हणजेत ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आला. त्यानंतर पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत योजना बदलण्यात आली आणि आता त्यात पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. टेक दिग्गज मायक्रोसॉफ्ट कॉर्पने सप्टेंबरमध्ये कामावर परतण्याची तारीख रद्द केली होती.