E-Rupi Launching by PM : पंतप्रधान मोदींच्या हस्ते ई-रुपी सेवेचा शुभारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ई-रुपी (e-RUPI) लाँच केलं आहे. कॅशलेस पेमेंटला प्रोत्साहन देणे हे ई-रुपीचे उद्दिष्ट आहे. आर्थिक सेवा विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांच्या सहकार्याने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आपल्या यूपीआय प्लॅटफॉर्मवर ई-रुपी विकसित केले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी म्हटले की, देशातील डिजिटल व्यवहार, डीबीटी अधिक प्रभावी करण्यासाठी ई-रुपी व्हाउचर मोठी भूमिका बजावणार आहे. केवळ सरकारच नाही, जर कोणतीही सामान्य संस्था किंवा संघटना एखाद्याच्या उपचारात, शिक्षणात किंवा इतर कोणत्याही कामासाठी मदत करू इच्छित असेल तर ते रोख पैशांऐवजी ई-रुपी देऊ शकतील. यामुळे दिलेला पैसा त्याच कामासाठी वापरला जाईल ज्यासाठी ती रक्कम दिली गेली आहे.
पीएम मोदींनी विरोधकांवर लक्ष्य साधताना म्हटले की, पूर्वी आपल्या देशात काही लोक असं म्हणत असत की तंत्रज्ञान ही केवळ श्रीमंतांची गोष्ट आहे. भारत हा गरीब देश आहे, तर भारतासाठी तंत्रज्ञानाचा काय उपयोग आहे. जेव्हा आमचे सरकार तंत्रज्ञानाला मिशन बनवण्याविषयी बोलत असे, तेव्हा अनेक राजकारणी, विशिष्ट प्रकारचे तज्ज्ञ त्यावर प्रश्न विचारत असत. पण आज देशाने त्या लोकांचा विचार नाकारला आहे आणि त्यांना चुकीचे देखील सिद्ध केले आहे. आज देशाचा विचार वेगळा आणि नवीन आहे. आज आपण तंत्रज्ञानाकडे गरीबांना, त्यांच्या प्रगतीला मदत करण्याचे साधन म्हणून पाहत आहोत.