छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ल्यात नाशिकचे सुपुत्र नितीन भालेराव शहीद, 9 जवान जखमी

Continues below advertisement

नाशिक : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात महाराष्ट्राचा एक सुपुत्र शहीद झाला असून नाशिकच्या नितीन भालेराव यांना वीरमरण आले आहे. नितीन भालेराव हे कोबरा बटालीयन 206 चे अधिकारी होते. कोबरा बटालियनचे जवान माओवादविरोधी अभियानावर गेले होते, शनिवारी रात्री परतत असतांनाच साडे आठच्या सुमारास बुर्कापाल कॅपच्या सहा किलोमीटर आधी माओवाद्यांच्या जाळ्यात जवान फसले. यावेळी माओवाद्यांनी तिथे IED ब्लास्ट घडवून आणला. या स्फोटात 9 जवान जखमी झाले असून त्यातील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचं बोललं जातंय. जखमी जवानांना उपचारासाठी रायपूर इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलय तर सहाय्यक कमांडट नितीन भालेराव यांचा मृत्यू झालाय.

भालेराव यांचं मूळ गाव निफाड तालुक्यातील देवपूर हे असून नोकरीनिमित्त काही वर्षापूर्वी नाशिक येथे कुटुंब स्थायिक झालेले होते. नितीन यांचे वडील पुरुषोत्तम भालेराव हे नाशिक येथे इंडिया सिक्यूरिटी प्रेसला कामगार होते. वीस वर्षापूर्वीच त्यांचं निधन झालं होतं. नाशिक शहराच्या राजीव नगर परिसरातिल श्रीजी सृष्टी अपार्टमेंट मध्ये आपल्या कुटुंबासमवेत ते राहत होते. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, आई आणि 5 वर्षाची मुलगी असा परिवार आहे. नितीन यांचे मोठे बंधू अमोल भालेराव हे नाशिकच्या नोट प्रेसमध्ये काम करतात तर लहान भाऊ सुयोग हे एका महाविद्यालयात शिक्षक आहेत. नितीन यांच्या अशा अचानक जाण्याने भालेराव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय.

नितीन यांनी आपले पदवीपर्यंतचे शिक्षण नाशिकच्या गोखले एज्युकेशन सोसायटीत पूर्ण केले होते. त्यानंतर यूपीएससी मार्फत झालेल्या परीक्षेत नितीन भालेराव हे 2013 मध्ये असिस्टंट कमांडर म्हणून सेवेत दाखल झाले होते. डेहराडून येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर गांधीनगर, काश्मीर, पेहलगाम, दिल्ली लोकसभा गेट नं 2, पंतप्रधान कार्यालय सुरक्षा, पंतप्रधान निवासस्थान या ठिकाणी त्यांनी सेवा केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रथम शपथविधीच्या सुरक्षा पथकातही नितीन यांनी सेवा केली होती. त्यानंतर मथुरा व नुकतीच त्याची रायपूर येथे नेमणूक झाली होती. जून महिन्यात नाशिकला ते आले होते आणि तिच कुटुंबीयांसोबत झालेली त्याची भेट अखेरची ठरली. पुढील दोन दिवसात ते पुन्हा नाशिकला सुट्टीनिमित्त येणार होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram