ABP News

Sangli River : सांगलीतील कृष्णा नदीची पाणीपातळी 40 फुटांवर, लष्कराची एक तुकडी सांगलीत : ABP Majha

Continues below advertisement

कृष्णा नदीची (Krishna River) पाणी पातळी 40 फुटांवर पोहोचली आहे. खबरदारी म्हणून लष्कराची एक तुकडी सांगलीत (Sangli) दाखल झाली आहे. तसेच नागरिकांना सतर्कतेचा इशार देखील देण्यात आला आहे. रात्री जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मनपा आयुक्त यांनी लष्कराच्या तुकडीच्या अधिकाऱ्यांसोबत कृष्णा नदीच्या पाणी पातळीचा आढावा घेतला आहे. आजही पश्चिमेकडील 4 तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. 

कृष्णेच्या पाणी पातळीत संथ गतीने वाढ

कोयना धरणात काल कमी झालेल्या पावसाने आणि कमी होत असलेल्या विसर्गामुळे सांगलीत कृष्णेच्या पाणी पातळीत आता संथ गतीने वाढ होत आहे. कृष्णा नदीची 40 फूट ही इशारा पातळी आहे. पावसाचा जोर वाढला तर या पातळीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. अन्यथा 40 फुटाच्या आसपास पाणी पातळी स्थिर होण्याचा अंदाज आहे. 

कोल्हापुरात पंचगंगा नदीची पाणी पातळी 47 फुटांवर

कोल्हापुरात पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 47 फूट इतकी पोहोचली आहे. तर जिल्ह्यातील 94 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीचा प्रवाह अतिशय वेगाने होत असून कोल्हापूर- रत्नागिरी महामार्गावर आंबेवाडी जवळ पाणी आलं आहे. कोल्हापूर शहरातील सुतार वाडा आणि कुंभार गल्ली इथं पाणी आलं आहे. तिथल्या नागरिकांना जिल्हा प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलं आहे. कोल्हापूर शहराचा मुख्य चौक असलेल्या व्हीनस कॉर्नर चौकामध्ये पंचगंगा नदीचे पाणी यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळं या चौकातून होणारी वाहतूक काही प्रमाणात बंद केली आहे. कोल्हापूर शहरात कोणत्याही ठिकाणी जायचं असल्यास याच चौकातून जावं लागतं. मात्र, आता त्याच कॉर्नर चौकामध्ये पाणी आल्याने कोल्हापूरकरांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे.

आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कुठं ऑरेंज अलर्ट तर कुठं यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगडरत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे आणि सातारा जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मुंबईसह ठाणे जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट तर काही भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram