IAS Shubham Gupta : आदिवासींचे पैसे लाटल्याचा ठपका! IAS शुभम गुप्ता यांच्यावर कारवाई...
Maharashtra News : मुंबई : पूजा खेडकर प्रकरण ताजं असतानाच आता आणखी एका आयएएस अधिकाऱ्यानं प्रशिक्षणार्थी असताना एक मोठा घोटाळा केल्याचं समोर आलं आहे. या घोटाळ्याचा संपूर्ण कच्चा चिठ्ठा एबीपी माझाच्या हाती लागला आहे. सांगली महापालिकेचे विद्यमान आयुक्त शुभम गुप्ता हे प्रशिक्षणार्थी असताना आदिवासी विभागात कार्यरत होते. या विभागाअंतर्गत आदिवासींसाठी गायी म्हशी वाटपाची एक योजना राबवण्यात आली. या योजनेत प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांनी प्रचंड भ्रष्टाचार करून आदिवासींच्या पैशांचा मोठा अपहार केल्याचं उघड झालं आहे. सरकारच्या चौकशी समितीच्या अहवालात हे तपशीलवार नमूद करण्यात आलं आहे.
लाभार्थ्यांना नियमापेक्षा दुप्पट पैसे देऊन दुसऱ्या खात्यावर स्वतःच वळवून घेणं, लाभार्थ्यांना धमकावणं, नियमबाह्य कामांसाठी स्वतःच्याच विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना धमकावणं, बोगस पशूवैद्यक अधिकाऱ्यांच्या सह्या जोडणं असे अनेक गैरप्रकार सांगली महापालिकेचे विद्यमान आयुक्त शुभम गुप्ता (Shubham Gupta) यांनी केल्याचं सिद्ध झालं आहे.