राजस्थानमध्ये पुजाऱ्याच्या हत्येनंतर रोष, आरोपींना अटक होईपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा

Continues below advertisement

राजस्थान : राजस्थानातील करौली येथील बुकना गावात झालेल्या पुजाऱ्याच्या हत्येनंतर मोठा रोष व्यक्त केला जात आहे. गावकऱ्यांनी मृत पुजारी बाबूलाल यांच्या परिवाराला योग्य मदत आणि आरोपींना अटक होईपर्यंत अंतिमसंस्कार न करण्याचा पवित्रा घेतला आहे. या मागणीसाठी गावकरी आक्रमक झाले असून धरणे आंदोलन केलं जात आहे. परिवाराचं म्हणणं आहे की, सर्व आरोपींना अटक जोवर केली जात नाही तोवर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत. तसंच योग्य मदत आणि सुरक्षेची देखील मागणी परिवाराने केली आहे.


पुजारी बाबूलाल यांच्या एका नातेवाईकाने म्हटलं आहे की, आमची मागणी आहे की, सर्व आरोपींना अटक करा. तसंच आरोपींना पाठिशी घालणाऱ्या तलाठी आणि पोलिसांवर देखील कारवाई करा. तसेच परिवाराला 50 लाख रुपयांची मदत, एका सदस्याला सरकारी नोकरी आणि परिवाराला योग्य सुरक्षा पुरवावी, असं म्हटलं आहे. या मागण्या जोवर पूर्ण होत नाहीत, तोवर बाबूलाल यांच्यावर अंत्यसंस्कार करणार नाहीत, असंही त्यांनी म्हटलं आहे.


परिवाराशी संवाद साधण्याचा प्रयत्न सुरु
प्रशासनाकडून पुजारी बाबूलाल यांच्या परिवाराशी संवाद केला जात आहे. एसडीएम यांनी परिवाराची भेट घेतली. ते म्हणाले की, त्यांच्या सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार सुरु आहे. बाबूलाल यांच्या अंत्यसंस्कारासाठी लोकं जमा झाले आहेत. त्यांनी काही मागण्या ठेवल्या आहेत. सरकारला याबाबत आम्ही कल्पना दिली आहे.


जमिनीच्या वादातून जीवंत जाळलं
बुधवारी राजस्थानातील करौली येथील बुकना या गावी मंदिराच्या जमिनीवरून झालेल्या वादात पुजाऱ्यावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्यात आलं होतं. जळालेल्या गंभीर अवस्थेत पुजाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.  राज्याच्या मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे.  मंदिराची जागा बळकावण्यासाठी कैलास मीणा, शंकर, नमो, रामलखन मीणा आदी छप्पर टाकत होते. यादरम्यान वयस्कर पुजारी बाबूलाल यांनी ते सुरु असलेले काम थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी आरोपींनी त्यांच्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिलं.

 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram