TET Paper Leak Case : घोटाळ्याचा आकडा 5 कोटींपर्यंत, Pune पोलीस आयुक्तांची पत्रकार परिषद ABP Majha

Continues below advertisement

TET Paper Leak Scam : शिक्षक पात्रता परीक्षेतही घोटाळा झाल्याचे समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी आज आणखी दोन बड्या माशांना अटक केली आहे.  महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष सुखदेव डेरे आणि बंगळुरूमधून जीए टेक्नॉलॉजीच्या प्रमुख अश्विनकुमार यांना अटक करण्यात आली आहे. सुखदेव डेरे हे टीईटी परीक्षेच्या वेळी नियंत्रक होते. तर, जीए टेक्नॉलॉजीकडे या परीक्षेचे कंत्राट होते. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून आणखी काहीजणांना टप्प्याटप्प्याने अटक करण्यात येणार असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की,  म्हाडा भरती पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात इतर परीक्षांमध्येही घोटाळे झाले असल्याचे समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी याचा तपास सुरू केला. 2018 मध्ये झालेल्या टीईटी परीक्षा घोटाळ्यात डेरे हा सूत्रधार असल्याची माहिती मिळाली. टीईटीची 15 जुलै 2018 रोजी परीक्षा पार पडली होती. या परीक्षेचा निकाल 12 ऑक्टोबर 2018 रोजी जाहीर झाला. त्यावेळी परीक्षा नियंत्रक डेरे होते. तर, परीक्षेचे कंत्राट जीए टेक्नॉलॉजीकडे होते. या परीक्षेतही घोटाळ्याचा पॅटर्न सारखा असल्याचे समोर आले. पैसे घेतलेल्या उमेदवारांना उत्तरपत्रिकेतील ओएमआर रिकामे सोडण्यास सांगितले जायचे. उत्तरपक्षिका स्कॅन करताना या उमेदवारांच्या उत्तरपत्रिका भरल्या जायच्या अथवा त्यांना गुण दिले जायचे. या आरोपींनी निकालात घोटाळा करताना खोटी प्रमाणपत्रे दिली असल्याचे समोर आले असल्याची माहिती पोलीस आयुक्त गुप्ता यांनी दिली. 

या प्रकरणातील आणखी काही आरोपींना टप्प्याटप्प्याने अटक करण्यात येणार आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे पुरावेदेखील मिळाले असल्याची माहिती पोलीस आयुक्त गुप्ता यांनी दिली. आरोपींची गुन्ह्यातील भूमिका नेमकी काय होती, याबाबत सविस्तरपणे कोर्टात माहिती देण्यात येणार आहे. या घोटाळ्यात सहभागी असणाऱ्या सर्वांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram