Pune Ganpati Visarjan | पुण्यात तब्बल ३२ तासांनी विसर्जन मिरवणूक पार, पोलिसांच्या प्रयत्नांवर पाणी
पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुका तब्बल बत्तीस तासांनंतर पार पडल्या आहेत. गेल्या वर्षीचा अठ्ठावीस तासांचा विक्रम यंदा मोडला गेला. यामुळे कमी वेळेत मिरवणूक पार पाडण्याचे पुणे पोलिसांचे प्रयत्न निष्फळ ठरले. पोलिसांचे सूक्ष्म नियोजनही फसल्याचे प्रश्न उपस्थित होत आहेत. दोन मंडळांमधील लांबलेले अंतर आणि रेंगाळलेल्या मिरवणुकांमुळे पोलिसांचे वेळापत्रक कोलमडले. पोलिसांनी मानाच्या आणि प्रमुख मंडळांना वेळापत्रक ठरवून दिले होते, तरीही अनेक सार्वजनिक गणेश उत्सवाच्या मंडळांच्या मिरवणुका रखडल्या. बत्तीस तासांनंतर विसर्जन पार पडल्यानंतर पोलिस प्रशासनानेही ठेका धरला. संपूर्ण प्रशासनावर दोन दिवसांचा ताण होता. गणपती बाप्पांचे विसर्जन झाल्यानंतर पोलिसांनी हात जोडले. राज्यभरात विसर्जन मिरवणुकांना गालबोट लागले असून, पंधरा जणांचा मृत्यू झाला आहे.