Pune CID : Walmik Karad पुण्यात CID ला शरण येणार, सीआयडी ऑफिसबाहेर बंदोबस्त वाढवला!

Continues below advertisement

पुणे: बीड येथील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) हत्या प्रकरण आणि पवन ऊर्जा कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणी सीआयडीचे पथक वेगाने तपासाची चक्रे फिरवत आहे. याचदरम्यान बीड येथे पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणी प्रकरणात आरोपी असलेले वाल्मिक कराड (Walmik Karad) यांना 29 डिसेंबरच्या रात्रीच पुण्यातून सीआयडीने अटक केल्याचे वृत्त समोर येत आहे. मात्र सीआयडीने वाल्मिक कराडला अटक केल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. वाल्मिक कराडला अटक करण्यात आलेली नाहीय, असं सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. परंतु आता अचानक पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवल्याने चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड हे फरार आहेत. ते सोमवारी संध्याकाळी किंवा मंगळवारी सकाळपर्यंत पोलिसांना शरण येतील, अशी चर्चा होती. मात्र, अद्याप वाल्मिक कराड पोलिसांना शरण आलेले नाहीत. मात्र, आता पुण्यातील सीआयडी मुख्यालयाबाहेरील हालचालींना वेग आल्याने वाल्मिक कराड सीआयडीसमोर शरणागती पत्कारण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यानंतर आता पुण्यातील सीआयडी मुख्यालयाबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. स्थानिक पोलीसांची मदत मुख्यालयासमोर बंदोबस्तासाठी घेण्यात आली आहे. दरम्यान वाल्मिक कराड हा खंडणी प्रकरणातील आरोपी असला तरी केज पोलीस ठाण्यात दाखल असलेले तिन्ही गुण्याचा तपास सीआयडी करत आहे, त्यामुळे तो सीआयडी कडे समर्पण करत आहे, अशी माहिती समोर आली आहे. 

वाल्मिक कराड यांचे शेवटचे मोबाईल लोकेशन मध्य प्रदेशात दिसून आले होते. वाल्मिक कराड हे उज्जैन येथील महाकाल मंदिर आणि मध्य प्रदेशातील पेच अभायारण्यात काही काळ मुक्कामाला असल्याची माहितीही समोर आली होती. मात्र, आता वाल्मिक कराड पोलिसांना शरण येतात का, हे पाहावे लागेल. सीआयडी कार्यालयात पुणे पोलीस दलातील पोलीस उपायुक्त सौदीपसींग गील आणि गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे दाखल. वाल्मीक कराड सी आय डी ला शरण आल्यास त्यांच्या समर्थकांची गर्दी होऊ शकते हे लक्षात घेऊन पुणे पोलीसांकडून सी आय डी कार्यालयाबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram