Koregaon Park Pune : नदी सुशोभीकरण प्रकल्प नागरिकांच्या जीवावर उठला; इमारत कोसळण्याची भीती
Koregaon Park Pune : नदी सुशोभीकरण प्रकल्प नागरिकांच्या जीवावर उठला; इमारत कोसळण्याची भीती पुण्यातील कोरेगाव पार्क (Koregaon Park) परिसरात असलेल्या पॉप्यूलर हाईटस-2 या इमारतीची कंपाउंड वॉल कोसळलीय. परवा झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) ही संरक्षण भिंत शनिवारच्या रात्री एक वाजताच्या सुमारास कोसळलीय. मात्र त्यानंतर आता या इमारतीच्या मागचा भाग देखील कोसळायला सुरुवात झाली आहे. या इमारतीच्या मागच्या भागाला मोठे भगदाड पडलय. परिणामी, या इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना घर खाली करण्यासाठी महापालिकेकडून नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही इमारतीतील 60 फ्लॅटमधील साधारत 300 ते 400 लोकांना स्थलांतरित करण्यात आल आहे. अशातच, आम्हाला आमच्या इमारतीमागे असलेली भिंत पुन्हा बांधून द्या, नाहीतर नुकसान भरपाई द्या, अशी मागणी या इमारतीत राहणाऱ्या रहिवासीयांकडून करण्यात येत आहे. सोबतच पुण्यात झालेल्या पुरस्थितीला नदी सुशोभीकरण प्रकल्प जबाबदार असल्याचा आरोपही कोरेगाव पार्कमधील संतप्त स्थानिकांनी केला आहे. नदी सुशोभीकरणाचा प्रकल्प आमच्या जीवावर उठला पुणे शहर (Pune Rain Update) परिसरात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा आज(रविवारी) पहाटेच्या सुमारास काही भागात संततधार पावसाने हजेरी लावली आहे. आज पुण्यासह घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज पुणे शहराला (Pune Rain Update) येलो अलर्ट देण्यात आला आहे. अशातच कोरेगाव पार्क मधील पॉप्यूलर या हाइट्स या हाउसिंग सोसायटीची सुरक्षा भिंत पावसाच्या पाण्याने पडलीय. पावसाचा जोर लक्षात घेता ही बहुमजली इमारत कोसळण्याची भिती महापालिका प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेत्या संगीता तिवारी यांनी प्रशासनाकडे वेळीच खबरदारी घेण्याची विनंती केली होती. तर संभाव्य धोका लक्षात घेता पुणे महापालिकेच्या वतीने येथील नागरिकांना घर खाली करण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे. मात्र ही घटना घडण्यामागे नदी सुशोभीकरणाचा प्रकल्पच कारणीभूत ठरला असून हा प्रकल्प आमच्या जीवावर उठला असल्याचा रोष स्थानिकांनी व्यक्त केला आहे.