Indrayani Bridge Collapse : कुंडमाळा पूल दुर्घटना, एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू,एकजण गंभीर जखमी
Pune Rain news: मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवर असणाऱ्या कुंडमळा पूल कोसळून रविवारी अनेक पर्यटक वाहून गेले होते. हा पूल कोसळला तेव्हा याठिकाणी तब्बल 100 पर्यटक उपस्थित असल्याची माहिती आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने (NDRF) कालच्या बचावकार्यात 51 जणांना नदीतून बाहेर काढले होते. यापैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर आठ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर सध्या पवना रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. तर उर्वरित लोक किरकोळ जखमी झाले होते. तळेगाव दाभाडे मधील मायमर रुग्णालयात 10 जणांना उपचारासाठी ठेवण्यात आल होत. त्यातले दोघे आयसीयूमध्ये होते. बाकी रुग्णांना किरकोळ इजा होती त्यांना रात्रीच घरी सोडण्यात आले. तळेगाव दाभाडेतील अथर्व रुग्णालयात 17 जणांना उपचारासाठी आणण्यात आले होते. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. मात्र, काल पुलावरुन (Kunjmala bridge) पडलेले आणखी किती जण बेपत्ता आहेत, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही. त्यामुळे एनडीआरएफकडून सोमवारी सकाळी पुन्हा एकदा बचावकार्याला सुरुवात केली जाणार आहे. ( Indrayani river bridge collapse)
काल रात्रभर मावळ तालुक्यात जोरदार पाऊस झाला. सोमवारचा दिवस उजाडल्यानंतरही मावळमध्ये मुसळधार पाऊस सुरु असल्याने इंद्रायणी नदीच्या पात्रातील पाण्याचा वेग आणखी वाढला आहे. त्यामुळे आज याठिकाणी बचावकार्य करताना एनडीआरएफसमोर मोठे आव्हान निर्माण होऊ शकते. कुंडमळा पुलाजवळ नदीच्या पाण्याचा वेग जोरदार आहे. त्यामुळे आता एनडीआरएफचे जवान नदीपात्रात उतरुन कशाप्रकारे बचावकार्य करणार, हे पाहावे लागेल.