Gauri Gaikwad PC : राष्ट्रवादीकडून मला त्रास दिला जातो, लसीकरणावरून राष्ट्रवादीकडून माझ्यावर दबाव
पुणे : पुण्यात महिला सरपंचाला राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) कार्यकर्ते मारहाण करत असल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. पुण्यातील कदमवाकवस्ती भागात लसीकरण केंद्रात ही घटना घडली आहे. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून टीका होत आहे. भाजपा उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विटरवर घटनेविषयी संताप व्यक्त केला. हे धक्कादायक चीड आणणारं आणि तळपायाची आग मस्तकापर्यंत नेणारं असल्याचं वाघ यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाल्या चित्र वाघ?
चित्रा वाघ यांनी घटनेचा व्हिडीओ ट्विट केला असून “पुण्याजवळील कदमवाकवस्ती गावच्या लोकनिर्वाचित सरपंच गौरी गायकवाड यांना मारहाण झाली आहे. मारहाण करणारा कोण? तर तो आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा,” “गृहखातं ज्या पक्षाकडे त्या पक्षाच्या आमदार व कार्यकर्त्यांना महिला अधिकाऱ्यांना गलीच्छ शिवीगाळ करणे, त्यांना ॲट्रोसिटीच्या धमक्या देणे, महिला सरपंचाला मारहाण करणे याचं लायसन्स दिलयं का?,” असा प्रश्न विचारला आहे.