ED चौकशीला Anil Parab गैरहजर, ED कडे मागितली 14 दिवसांची मुदत : ABP Majha
Anil Parab ED Inquiry : महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा सुरुच आहे. अशातच आता शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली असून आज सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहणाचे आदेश देण्यात आले आहेत. पण अनिल परब चौकशीसाठी गैरहजर होते. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी ईडीला दिलेल्या जबाबात अनिल परब मुंबई आणि ठाण्यातील पोलीस दलातील बदल्या करत होतं, असं सांगितल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय मुंबई महापालिकेच्या कंत्राटदारांकडून 50 कोटी रुपये वसूल करण्यासाठी अनिल परब यांनी सांगितलं होतं, असा दावाही सचिन वाझे यांनी पत्र लिहून केला होता.
ईडीची नोटीस मिळाल्यानंतर अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी याप्रकरणी आपली पहिली प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी ते म्हणाले होते की, "ईडीची नोटीस मिळाली, त्यात कुठल्याही प्रकरणाचा स्पष्ट उल्लेख नाही. केवळ 31 ऑगस्ट रोजी ईडीच्या कार्यालयात हजर राहावं असं नोटीसमध्ये म्हटलं आहे, अशी माहिती अनिल परब यांनी दिली होती. पुढे ते म्हणाले होते की, "नोटीसमध्ये कोणताही स्पष्ट उल्लेख नाही, त्यामुळे ही नोटीस कशा संदर्भात आहे, हे आता सांगता येणं सध्यातरी कठीण आहे. नोटीसमध्ये सविस्तर काही लिहीलं नाही. त्यामुळे कुठल्या कारणास्तव ही नोटीस दिली हे सांगता येणार नाही. केवळ चौकशीसाठी बोलावल्याचा त्यात उल्लेख आहे. यावर कायदेशीर सल्ला घेऊन आम्ही त्याला उत्तर देऊ. ईडीची नोटीस येईल असा अंदाज होताच. आता कायदेशीर बाबींचा विचार करुन याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल." असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.
शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली होती. केंद्र सरकारनं सूडबुद्धीने ही कारवाई केलीय का असा प्रश्न संजय राऊत यांच्या ट्वीटमुळे उपस्थित होतोय. संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं की, "शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत. Chronology कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायदयानेच लढू. जय महाराष्ट्र."