Rahul Gandhi in Parbhani : सोमनाथ सूर्यवंशीची हत्या पोलिसांनीच केली, राहुल गांधींचा थेट आरोप
परभणी : सोमनाथ सूर्यवंशीची हत्या ही पोलिसांनीच केली आहे असा थेट आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना पाठीशी घालण्यासाठी खोटं वक्तव्य केलं असल्याचा आरोपही त्यांनी केला. संविधानाचं रक्षण करणाऱ्या सोमनाथची हत्या करणाऱ्यावर कारवाई व्हावी अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.
न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवशी या तरुणाच्या मृत्यूनंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या प्रकरणात नेमकं काय झालं, आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली याची माहिती यावेळी राहुल गांधी यांनी घेतली. या वेळी राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे राज्यातील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते.
निळा टी शर्ट परिधान करून राहुल गांधी यांनी परभणीतील दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेतली. न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरूणाचा मारहाणीच्या धक्क्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर या प्रकरणाती दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.