Pakistan Voilates Ceasefire : पाकीस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, उमर अब्दुल्लांकडून दुजोरा
Pakistan Voilates Ceasefire : पाकीस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, उमर अब्दुल्लांकडून दुजोरा
कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं म्हणतात तीच गत पाकिस्तानच्या (Pakistan) बाबतीत आहे का, असा प्रश्न आता पु्न्हा उद्भवला आहे. कारण, आज सायंकाळी 5.00 वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य कारवाईला विराम देण्यात आल्याची घोषणा भारताच्या परराष्ट्र सचिवांनी केली. त्यासाठी, पाकिस्तानच्या संरक्षण विभागातील महासंचालकांचा फोन आला होता, ही माहिती देखील त्यांनी दिली. त्यामुळे, आता युद्धविराम झाला असून सीमारेषेवरील तणाव निवळेल अशी अपेक्षा भारतासह जगभरातील राष्ट्रांना होती. मात्र, 5 वाजता युद्धविरामाची (ceasefire) घोषणा झाली आणि सीमारेषेवर पुन्हा पाकिस्तानच्या नापाक कारवायाला सुरुवात झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. हीच का शस्त्रसंधी? असा सवाल जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला (Omar abdullah) यांनी विचारला आहे. ओमर अब्दुल्ला यांनी एकामागोमाग एक ट्विट करत शस्त्रसंधीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे, पाकिस्तानच्या लष्करावर पाकिस्तान सरकारचे नियंत्रण नसल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीचं स्वागत करत जम्मू काश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करुन हवाई वाहतूक सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र, काही वेळातच सीमारेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन होत असल्याची माहिती स्वत: ओमर अब्दुल्ला यांनी दिली आहे. अब्दुल्ला यांनी दोन ट्विट केले आहेत. त्यातील एका ट्विटमध्ये व्हिडिओ शेअर करत प्रश्न उपस्थित केला आहे. याला युद्धबंदी म्हणत नाहीत, श्रीनगरच्या मध्यभागी असलेल्या हवाई संरक्षण तुकड्या नुकत्याच उघडल्या गेल्या आहेत. तर, युद्धबंदीचे काय झाले? श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे. त्यामुळे, सीमारेषेवरील तणाव अद्यापही कायम असून काही भागांत पाकिस्तानचे ड्रोन घिरट्या घालताना दिसत आहेत. म्हणून, पाकिस्तान म्हणजे कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच असंच या शस्त्रसंधी उल्लंघनावरुन दिसून येत आहे.