Nashik Loksabha Constituency :भुजबळांच्या नावाची चर्चा, गोडसेंना धाकधूक महायुतीतील तिढा कधी सुटणार?
Nashik Loksabha Constituency :भुजबळांच्या नावाची चर्चा, गोडसेंना धाकधूक महायुतीतील तिढा कधी सुटणार? लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक मतदारसंघात महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. या जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. महायुतीच्या शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपकडून नाशिकच्या जागेवर दावा केला गेलाय. तर दुसरीकडे शिवसेनेकडून हेमंत गोडसे आणि राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांच्यात रस्सीखेच सुरु असतानाच आता यात भाजप पुन्हा आक्रमक झालीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदेंनी नाशिक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी हेमंत गोडसेंना जाहीर केली होती. यानंतर महायुतीतील इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर उमटला आणि त्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून या जागेवर दावा करण्यात आला. काही दिवसांपूर्वीच छगन भुजबळ हे नाशिकच्या जागेवर उमेदवार असतील, असे संकेत मिळाल्याने गोडसेंची धाकधूक मात्र वाढली होती. आता नाशिक लोकसभेच्या जागेवरून शिवसेना राष्ट्रवादीमध्ये संघर्ष सुरू असताना भाजपाने उडी घेतली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातील काही मंडळ अध्यक्षांनी राजीनामा देण्याचा इशारा दिलाय.नाशिकची जागा भाजपाला नाही दिली तर राजीनामा देणार, असं पदाधिकाऱ्यांनीही म्हटलं आहे. छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे यांच्यात रस्सीखेच सुरू असतानाच आता पुन्हा भाजपने आक्रमक भूमिका घेतल्याने नक्की नाशिकची जागा कुणाला मिळणार? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. तर शिवसेना ठाकरे गटाकडून नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, नाशिकमध्ये छगन भुजबळांना उमेदवारी जाहीर होण्याआधीच त्यांना विरोध सुरु झाला आहे. सकल मराठा समाजाकडून भुजबळांना विरोध केला जात आहे. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या भुजबळ यांना मतदान न करण्याचे आवाहन करण्याऱ्या पोस्ट देखील व्हायरल होत आहेत. तसंच रस्त्यांवर भुजबळांच्या विरोधात होर्डींग्स लावण्यात आले आहेत. भुजबळांविरोधात मराठा समाज एकवटल्याचे चित्र आहे. नक्की नाशिकचा तिढा कधी सुटणार ? आणि कसा सोडवणार याचं महायुतीपुढे नक्कीच आव्हान असल्याचं एकंदरित चित्र आहे