Nashik Guardian Minister : भुजबळांची एन्ट्री, नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी स्पर्धा वाढली
Nashik Guardian Minister : भुजबळांची एन्ट्री, नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी स्पर्धा वाढली
Chhagan Bhujbal Maharashtra Cabinet: महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण कोळून प्यायलेल्या मोजक्या नेत्यांपैकी एक अशी ओळख असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे पुन्हा एकदा अनपेक्षितपणे प्रकाशझोतात आले आहेत. महायुती सरकारच्या स्थापनेवेळी राज्य मंत्रिमंडळात छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा समावेश करण्यात आला नव्हता. त्यावेळी छगन भुजबळ प्रचंड नाराज झाले होते. तेव्हापासून छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेतृत्त्वापासून आणि पक्षीय घडामोडींपासून काहीसे अंतर आणि अबोला राखून होते.
दरम्यानच्या काळात राज्य आणि देशपातळीवरील अनेक घडामोडींमुळे छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदाचा विषयही राजकीय वर्तुळाच्या विस्मरणात गेला होता. खुद्द छगन भुजबळ यांनीच मंत्रिपद न मिळाल्याबाबत अधुनमधून नाराजी व्यक्त करण्यापलीकडे ठोस काहीतरी घडेल, ही आशा सोडून दिली होती. मात्र, सोमवारी रात्री महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनपेक्षित घडामोडी घडल्या आणि छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार, हे निश्चित झाले. छगन भुजबळ हे मंगळवारी सकाळी 10 वाजता राजभवनात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत मंत्रिपदाची शपथ घेतील, असे सांगितले जात आहे. छगन भुजबळ यांना मंत्रिपद स्वीकारल्यानंतर धनंजय मुंडे यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा खात्याचा कारभार सोपवला जाईल, अशी दाट शक्यता आहे. (Maharashtra State Cabinet)