Special Report | व्यावसायिक नवरा नको, नागपुरातील रितेश झुनकेला तब्बल 500 मुलींचा लग्नासाठी नकार
पंतप्रधान मोदींनी दिलेल्या आत्मनिर्भर शब्दाला सध्या वेगळेच महत्व आहे. मात्र, नागपुरात असाच एक आत्मनिर्भर तरुण वेगळ्याच समस्येत अडकला आहे. कारण रितेश झुनके नावाच्या पठ्ठयाला आजवर पाच दहा नव्हे, तर तब्बल पाचशेपेक्षा जास्त तरुणींनी लग्नासाठी नकार दिला आहे. उच्चशिक्षित असूनही नोकरीऐवजी ट्रान्सपोर्टच्या व्यवसायात आपल्या पायावर उभ्या असलेल्या आणि 40 हजार रुपये महिना कमावणाऱ्या आत्मनिर्भर रितेशने स्वतःच्या लग्नासाठी आजवर अनेक स्थळं तपासले, कुटुंबियांसोबत मुलींच्या घरी गेला, फोनवर मुलीच्या कुटुंबियांना संपर्क केले, विवाह मेळाव्यात सहभाग नोंदवले, मेट्रीमॉनियल साईट्सवर नोंदणी केली, मात्र त्याचा लग्न काही झालं नाही. त्यामुळे 'फक्त नोकरीवाला मुलगा हवा' व्यवसाय करुन आत्मनिर्भर असलेला नवरा नकोच, मुली आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अशा आग्रहापायी शहरी भागातील अनेक तरुणांवर अविवाहित राहण्याची वेळ आली आहे का?