Samruddhi Mahamarg : समृद्धीवरील नागपूर-शिर्डी बस सेवा स्थगित
Nagpur News : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) सुरु झालेली पहिली बस सेवा स्थगित करण्यात आली आहे. अपेक्षेप्रमाणे डिझेलचे पैसे निघतील एवढेही प्रवासी मिळत नसल्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने समृद्धी महामार्गावरुन धावणाऱ्या नागपूर-शिर्डी बस सेवेला स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने मोठा गाजावाजा करत डिसेंबरपासून नागपूर ते शिर्डी अशी समृद्धी महामार्गावरील पहिली एसटी बस सेवा सुरु केली होती. फक्त तेराशे रुपये भाडे असलेल्या या सेवेच्या माध्यमातून आठ तासात शिर्डीला पोहोचता येत असल्याने या बस सेवेला मोठा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, अवघ्या तीन महिन्यातच समृद्धी महामार्गावरील पहिली एसटी बस सेवा बंद करण्याची नामुष्की एसटीवर ओढावली आहे. अपेक्षेप्रमाणे प्रवासी मिळत नसल्यामुळे ही बस सेवा स्थगित करण्यात आल्याची माहिती आहे.