Shivaji Park हे खेळाचं मैदान,कुणाचंही स्मृतीस्थळ नको,स्थानिकांची मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका
दादरचं छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे भविष्यात खेळाचंच मैदान राहावं यासाठी भविष्यात तिथे कुणाही दिग्गजांचं स्मृतिस्थळ बनवायला विरोध करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. शिवाजी पार्क परिसरातील रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बेलवडे यांनी ही याचिका दाखल केली आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर रविवारी शिवाजी पार्कमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर लतादीदींचं स्मारक शिवाजी पार्कातच उभारण्यात यावं अशी मागणी भाजपचे आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली. त्या पार्श्वभूमीवर स्मारकाच्या मुद्यावरून मुंबईत राजकीय वाद निर्माण झाला होता. पण शिवाजी पार्कात लतादीदींचं स्मारक उभं राहावं ही मंगेशकर कुटुंबीयांची इच्छा नाही अशी संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी मांडली आणि स्मारकाच्या वादावर पडदा पडला.