लष्कराची गुपितं बाहेर कशी येतात? अर्णब गोस्वामींच्या व्हायरल चॅटसंदर्भात संजय राऊतांचा सवाल
मुंबई: देशावर पुलवामा हल्ला होणार आहे हे आधीच अर्णब गोस्वामींना माहित होत, याचा अर्थ लष्कराची गुपितं सुरक्षित नसल्याचं सांगत ही गुपितं बाहेर येतातच कशी असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केलाय. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राष्ट्रीय गुपितं, लष्कराची गुपितं जर बाहेर येत असतील तर तो देशाच्या अंतर्गत सुरक्षेला सर्वात मोठा धोका असल्यांच मत खासदार संजय राऊत यांनी केलंय. या प्रकरणी देशाच्या गृहमंत्र्यांनी आणि संरक्षण मंत्र्यांनी आपली भूमिका मांडावी अशीही मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
रिपब्लिक टीव्हीचे कार्यकारी संपादक अर्णब गोस्वामी आणि ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे (बार्क) माजी सीईओ पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप संभाषणाचे स्क्रीनशॉट समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. पार्थ दासगुप्ता हे टीआरपी घोटाळ्यातील आरोपी असून मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातही त्यांचे नाव आहे.