नालेसफाई कंत्राटदाराला अमानूष वागणूक देणारे शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे वादाच्या भोवऱ्यात
मुंबई : मुंबईमध्ये गेल्या तीन दिवसांत झालेल्या पावसाने ठीक ठिकाणी मोठ्या प्रमानात पाणी भरले होते. यामुळे मुंबईची नालेसफाईबाबत विरोधक जोरदार टीका करीत आहेत. अशातच चांदीवलीच्या शिवसेनेच्या आमदार दिलीप लांडे यांना चक्क पालिकेच्या कंत्राटदाराला नाल्याच्या कचऱ्यात बसविण्याची आज वेळ आली. चांदीवली मधील संजय नगर भागात मोठ्या प्रमाणत नाले तुंबलेले होते. या बाबत नागरिकांनी तक्रार केल्यावर स्थानिक आमदार दिलीप लांडे हे त्या ठिकाणी गेले, सोबतच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना देखील घेऊन गेले आणि ही नालेसफाई सुरु केली. मात्र या नालेसफाईचे कंत्राट ज्या कंत्राटदाराला दिले होते, त्याला त्या ठिकाणी बोलावून आमदारांनी चक्क त्याच नाल्याच्या कचऱ्यात बसवले. जनतेचा त्रास त्याला कळवा म्हणून असे केल्याचे ते यावेळी सांगत होते. मात्र यामुळे एकीकडे महापौर संपूर्ण नालेसफाई झाल्याचे सांगत असताना दुसरीकडे शिवसेनेच्या आमदराला कंत्राटदाराला नाल्याच्या तुंबलेल्या कचऱ्यात बसविण्याची वेळ आल्याचे दिसत आहे.