Sambhajiraje Chhtrapati | 'आपण लढा नक्की जिंकू, शूर सरदारांनो खचून जाऊ नका' - खासदार संभाजीराजे
मुंबई : वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट परीक्षेचा पेपर अवघड गेल्याने निराश झालेल्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना बीडमध्ये समोर आली. मराठा आरक्षणासाठी विवेकने आत्महत्या केल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यावरून खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा तरूणांना आत्महत्येचा पर्याय न निवडण्याचं आवाहन केलं आहे. बीडमधील तरुणाने आत्महत्या केल्याच्या घटनेवर शोक व्यक्त करत संभाजीराजेंनी हे आवाहन केलं आहे.
खासदार संभाजीराजे भोसले यांनी सोशल मीडियामार्फत मराठा तरूणांना हे आव्हान केलं आहे. संभाजीराजे म्हणाले की, 'विवेक राहाडे या युवकाने समाजासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या परिवारासोबत आमच्या संवेदना आहेत. घरातील कर्तृत्वाला आलेला युवक असा अकाली जाणं, ही कधीही न भरून निघणारी हानी आहे. मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. समाजासाठी बलीदान दिलेल्या या मावळ्याला विनम्र श्रध्दांजली!'
'माझ्या निडर वाघांनो तुम्हीच जर असे हातबल होऊन आत्मबलिदान देणार असाल, तर मला चांगलं वाटणार आहे का? या लढाईतील प्रत्येक मावळा माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. सर्वांना माझी नम्र विनंती आहे कोणीही असे पर्याय निवडू नयेत.' , असं आवाहन खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा तरूणांना केलं आहे.
पुढे बोलताना खासदार संभाजीराजे म्हणाले की, 'एक लक्षात ठेवा हा समाज, "लढून मरावं, मरून जगावं" हेच आम्हाला ठावं, असे पोवाडे गाणारा आहे. माझ्या शूर सरदारांनो खचून जाऊ नका. आज परिस्थिती जरी आपल्या विरोधात वाटत असली, अंधारात जात असलेली वाटत असली तरी, उद्या नक्की पहाट होईल. सर्व काही ठीक होईल. आपण लढाई जिंकूंच!'