Raj Thackeray MNS Meeting : विधानसभेसाठी मनसे अॅक्शन मोडवर, राज ठाकरेंनी बोलावली महत्त्वाची बैठक
MNS Raj Thackeray Meeting : मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर मनसे (MNS) अॅक्शन मोडवर आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आज सकाळी साडेदहा वाजता वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात बैठक घेणार आहेत. मनसेच नेते, सरचिटणीस तसंच मुंबईतील (Mumbai News) प्रमुख पदाधिकारी बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत.
आगामी विधानसभा निवडणूक तसंच संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुपारी एक ते अडीचच्या दरम्यान पक्षातील विविध पद आणि जबाबदाऱ्यांसंदर्भात माटुंगा इथे कार्यक्रम पार पडणार आहे.
राज ठाकरेंना मोदींच्या शपथविधीला सन्मानपूर्वक निमंत्रण न मिळाल्यानं मनसेमध्ये नाराजीचा सूर
देशात तिसऱ्यांदा एनडीए सरकार स्थापन झालं. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान (Prime Minister Of India) पदाची शपथ घेतली. पण मोदींच्या भव्यदिव्य शपथविधी सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं नसणं हे चर्चेचा विषय ठरलं. राज ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीचं सन्मानपूर्वक निमंत्रण न मिळाल्याच्या चर्चांनंतर मनसेमध्ये अस्वस्थता पाहायला मिळाली. याच पार्श्वभूमीवर आज राज ठाकरेंची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. आजच्या बैठकीत निमंत्रणावरून नाराजीचे सूर उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, आजच्या बैठकीत मनसेच्या आगामी विधानसभा निवडणुकांवरील भूमिकाही स्पष्ट होण्याची शक्यता आहे.