Sanjay Rathod : वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा अजून राज्यपालांकडे पोहोचलाच नाही?
मुंबई : पूजा चव्हाणमृत्यू प्रकरणात ठाकरे सरकारमधील मंत्री संजय राठोड यांनी रविवारी (28 फेब्रुवारी) राजीनामा दिला होता. मात्र संजय राठोड यांचा राजीनामा अजून राज्यपालांकडे पाठवलाच नसल्याची माहिती समोर येत आहे. तीन दिवस उलटले तरी संजय राठोड यांचा राजीनामा अजून मुख्यमंत्र्यांकडेच आहे का? असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या संजय राठोड अद्यापही वनमंत्री पदावर कायम आहेत.
रविवारी संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी आता पुढे काय अशी विचारणा केली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की, राजीनामा फ्रेक करुन लावण्यासाठी घेतला नाही. त्यांचं म्हणणं असं होतं की राजीनामा लवकरच राज्यपालांकडे पाठवला जाणार आहे. मात्र संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे पोहोचलेला नाही. याचा अर्थ असा की कायदेशीरदृष्ट्या संजय राठोड वनमंत्री पदावर कायम आहेत.