MNS Posters | 'मुंबईतील उद्योग पळवण्यासाठी आलेला ठग!',योगी आदित्यनाथांविरोधात मनसेचे पोस्टर
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बॉलिवूडच्या अभिनेते आणि निर्मात्यांशी तसेच महाराष्ट्र आणि मुंबईतील उद्योजकांशी चर्चा करणार आहेत. उत्तर प्रदेशात निर्माण होणाऱ्या फिल्मसिटीत योगी आदित्यनाथ यांना मुंबईचं वैभव असलेल्या बॉलिवूडला न्यायचं आहे. त्यांच्या याच कृतीला मनसेने आता होर्डिंगच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. 'अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईतील उद्योग पळवण्यासाठी आलेला "ठग", 'कहा राजा भोज...और कहा गंगू तेली...' अशा आशयाचे होर्डिंग मनसेकडून मुंबईत योगी आदित्यनाथ ज्या ट्रायडंट हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत, त्याच हॉटेलच्या खाली लावले आहेत. मनसेचे घाटकोपर येथील विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी योगी आदित्यनाथ यांच्या नावाचा उल्लेख न करता त्यांना युपीचा "ठग" म्हटलंय. मुंबई लुटायला आलेल्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा इरादा हा मुंगेरीलालचे स्वप्नं असल्याचंही त्यांनी होर्डिंगमध्ये म्हटलंय. हेच होर्डिंग भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाबाहेरही लावण्यात आलं आहे.