Gateway of India Garbage Issue : गेट वे ऑफ इंडियाच्या समुद्रात टाकला कचरा; गुन्हा दाखल,शोध सुरू!
गेट वे ऑफ इंडिया येथे समुद्रात कचरा टाकणाऱया व्यक्तिवर महानगरपालिकेकडून १० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई ; बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ए विभागातील भारताचे प्रवेशद्वार अर्थात गेट वे ऑफ इंडिया या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी समुद्रात कचरा टाकत असलेले छायाचित्र हे समाजमाध्यमांवर आणि प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. अनेक नागरिक तसेच मान्यवरांनी या कृत्याबाबत खेद व्यक्त केला होता. या छायचित्राचा दाखला घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांनी सदर कचरा टाकणाऱया व्यक्तिचा शोध सुरू केला. कचरा घेऊन आलेल्या टॅक्सीचा नंबर काढून सदर व्यक्तिची ओळख पटवणे शक्य झाले. त्यानंतर या व्यक्तिला ए विभागातील घनकचरा व्यवस्थापन अधिकाऱयांनी १० हजार रुपयांचा दंड ठोठावला असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे देण्यात येत आहे.