Mumbai : गोरेगाव पूर्वेतील गोकुळधाम वसाहतीत बिबट्याचा वावर; CCTV फुटेज समोर ABP Majha
रेडिओ कॉलर लावलेला डेल्टा बिबट्या मुंबईच्या गोरेगाव पूर्वेतील गोकुळधाम वसाहतीत आढळून आलाय. गोकुळधाम वसाहतीतील एका इमारतीच्या आवारात बिबट्या फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. व्हिडीओमध्ये दिसणारा प्राणी रेडिओ कॉलर असलेला मादी बिबट्या सी ३३-डेल्टा आहे. काही दिवसांपूर्वी या मादी बिबट्याला पकडण्यात आलं होतं. तिला यानंतर रेडिओ कॉलर बसवून सोडण्यात आलं. ही मादी स्वभावाने शांत असून तिच्यापासून कोणताही धोका नसल्याचं वनविभागानं सांगितलंय. काही महिन्यांपूर्वी आरे परिसरात रहिवाशांवर हल्ले करणारा हा बिबट्या नसल्याचंही वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान वनविभागाचे पथक बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. वन विभागाच्या पथकांना परिसरात गस्त घालून जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रेडिओ कॉलरच्या माध्यमातून बिबट्या आणि मानवी संघर्ष याचा अभ्यास वनविभागाला करता येणार आहे.