Letter Bomb : काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी यांच्याकडून भाई जगताप यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित
मुंबई : मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या विरोधात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी,राहुल गांधी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. ही तक्रार केली आहे काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी यांनी. झिशान सिद्दिकी यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना पत्र लिहून भाई जगताप यांच्या विरोधात गंभीर आरोप केले आहेत.
माझ्याच पक्षाचा अध्यक्ष माझ्या विरोधात कारवाया करत असल्याचा गंभीर आरोप आमदार झिशान सिद्दिकी यांनी पत्रात केला आहे. यासाठी झिशान यांनी काही घटनांचा दाखला दिला आहे.
मुंबई काँग्रेस मार्फत जनतेला टूलकिट वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यातील एक कार्यक्रम वांद्रे येथील बीकेसी पोलीस स्थानकात घेण्यात आला. या कार्यक्रमाला काँग्रेस मंत्री आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते. पोलीस अधिकारी देखील उपस्थित होते पण, वांद्रे पूर्वचे आमदार झिशान सिद्दिकी यांना बोलवण्यात आले नाही. बीकेसी पोलीस स्थानक हे आमदार सिद्दिकी यांच्या मतदारसंघात येत तिथे काँग्रेसने कार्यक्रम घेऊन स्थानिक आमदाराला बोलवलं नाही हा प्रोटोकॉल तोडणे आहे आणि हे सार्वजनिकरित्या खजील करण्यासारखे आहे असं झिशान यांनी पत्रात म्हटलं आहे.
इतकंच नाही तर, काही महिन्यांपूर्वी मुंबई युवा काँग्रेसच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत झिशान सिद्दिकीला मदत केल्यास पक्षात पद देणार नाही असंही भाई जगताप यांनी पक्षातील नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना सांगितल्याचा गंभीर आरोप झिशान सिद्यकि यांनी आपल्या पत्रात केला आहे.