Mumbai BJYM Protest : राममंदिराच्या मुद्द्यावरुन सेना भवनाजवळ भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा
शिवसेनेकडून राम मंदिर संदर्भात भाजपवर करण्यात आलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी भाजपा युवा मोर्चाकडून आज शिवसेना भवन येथे विरोध प्रदर्शन करण्यात आलं. याला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्तेही तिथं जमले. यावेळी भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे चित्र दिसून आले. यावेळी गोंधळ उडाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादनाबाबत खोटे आणि बनावट आरोप करून शिवसेनेने हिंदू धार्मिक स्थळ आणि हिंदूंच्या श्रद्धा आणि आस्था यांचा अपमान केला असल्याचं म्हणत भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईतर्फे शिवसेनेविरोधात "फटकार मोर्चा" आयोजित करण्यात आला. यावेळी भाजयुमो आणि शिवसेना कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्यानं गोंधळ उडाला. बाबरी मज्जिद जेव्हा पाडण्यात आली तेव्हा शिवसेनेने गर्वाने पुढे आली आणि आता भाजप फक्त विनाकारण याचा राजकारण करत आहे, असं यावेळी आमदार सदा सरवणकर आणि माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी म्हटलं आहे. कुणीही महिलांवर हल्ला केलेला नाही. पोलिस तिथं उपस्थित होते, असं श्रद्धा जाधव म्हणाल्या.