ABP Majha च्या 'ऑपरेशन लुटारू'नंतर मुंबई पालिकेचा मोठा निर्णय : Kishori Pednekar EXCLUSIVE
मुंबई : शहरात क्लीनअप मार्शल सामान्यांकडून वसुली करत असल्याचं एबीपी माझाने आपल्या 'ऑपरेशन लुटारू' या स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून दाखवलं होतं. त्यावर विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं होतं. एबीपी माझाच्या या वृत्तानंतर आता मुंबईच्या महापौरांनी या मार्शलवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. मुंबईत सामांन्याकडून वसुली करण्याचा हा प्रकार धक्कादायक असल्याचं सांगत अशी वसुली करणाऱ्या मार्शलवर कारवाईचा निर्णय घेणार असल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.
सुरुवातीला महापौर किशोरी पेडणेकर यांनी एबीपी माझाचे आभार मानले. त्या म्हणाल्या की, "प्रत्येक व्यक्तीने मास्क हा घातलाच पाहिजे. पण या अशा प्रकारे सामान्यांची लूट होतेय हे धक्कादायक आहे. या सर्वाशी महापालिकेचा काही संबंध नाही. या प्रकरणी संबंधित कॉन्ट्रॅक्टर्सची मीटिंग घेणार आहे. आम्ही आता ठोस निर्णय घेतला आहे. स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून जे चेहरे समोर आले आहेत त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे. तसेच संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर सुद्धा कारवाई होणार. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल आणि त्यांना ब्लॅक लिस्ट केलं जाईल."
महापौर म्हणाल्या की, "सोमवारी आयुक्तसोबत या विषयावर बैठक बोलवण्यात आली आहे. त्यावेळी आपण यावर निर्णय घेऊ. हे सगळं पाहिल्यानंतर क्लिन आप मार्शल नको असंच वाटतंय. पण असं केलं तर सर्वसामान्य माणसं मास्क घालणार नाहीत. सगळेच मास्क घालत असतील तर मार्शल ठेवायची गरज नाहीच."