मुंबई : मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया'बाहेर स्फोटकं ठेवण्याच्या कटात मनसुख हिरणही सहभागी होता. आणि त्यामुळेच त्याला आपला जीव गमावावा लागला असा दावा एनआयएनं बुधवारी विशेष कोर्टात केला. कारण शेवटी या संपूर्ण प्रकरणात काहीतरी मोठा आर्थिक उद्देश होता हे स्पष्ट आहे, मग तो काय होता?, याचीही चौकशी होणं आवश्यक असल्याचं एनआयएनं कोर्टात सांगितलं.


या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझेला 9 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आहे. युएपीए कायद्यातील तरतूदीनुसार आरोपीची 30 दिवसांची कोठडी पूर्ण करू देण्याची मागणी एनआयएच्यावतीनं एएसजी अनिल सिंह यांनी कोर्टाला केली. त्यानुसार कोर्टानं वाझे यांनी आणखीन दोन दिवसांची एनआयए कोठडी वाढवून दिली आहे. तसेच त्यांना योग्य ती वैद्यकीय सुविधा देत, पुढील सुनावणीत वाझेंच्या प्रकृतीचा अहवाल सदर करण्याचे निर्देश तपासयंत्रणेला दिले आहेत. सचिन वाझेंसह याप्रकरणात अटकेत असलेल्या विनायक शिंदे आणि नरेश गोर यांच्या अधिक कस्टडीची गरज नसल्याचं तपासयंत्रणेनं कोर्टाला सांगितलं. त्यानुसार कोर्टानं त्यांना चौदा दिवसांची कोठडी देत 21 एप्रिलपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.


सीबीआयला सचिन वाझेंची चौकशी करण्यास परवानगी
दरम्यान सचिन वाझे यांची चौकशी करण्यास सीबीआयला कोर्टानं परवानगी दिली आहे. सीबीआयनं बुधवारी एनआयए कोर्टात तसा रितसर अर्ज केला होता. तेव्हा आता एनआयए कस्टडीतच सीबीआय परमबीर सिंह यांच्या आरोपांची चौकशी करणार आहे. याबाबतच्या वेळा दोन्ही तपासयंत्रणांनी आपापसात मिळून ठरवाव्यात असे निर्देशही कोर्टानं दिले आहेत. हायकोर्टाच्या आदेशानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांची चौकशी करण्यासाठी एक विशेष पथक मुंबईत दाखल झालं आहे. काही दिवसांपूर्वी परमबीर सिंह यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांनी मुबई पोलिसांना दरमहा 100 कोटींचा हफ्ता वसूल करून देण्याचे आदेळ दिले होते, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.


सचिन वाझे यांनी अन्य आरोपींकडे दिलेली लाखो रूपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. हा पैसा कठून आला, तो कशासाठी वापरायचा होता याची चौकशी होणं आवश्यक. कारण शेवटी यामागे काहीतरी मोठा आर्थित होता हे स्पष्ट आहे, मग तो काय होता?, याची चौकशी होणं आवश्यक असल्याचं एनआयएनं कोर्टात सांगितलं. या सुनावणी दरम्यान आरोपी विनायक शिंदेनं कोर्टाला आपल्याला विशिष्ठ जेलमध्ये पाठवण्याची मागणी केली. मात्र, आरोपीला जेल निवडण्याचा अधिकार नाही, रोस्टरप्रमाणे ज्या जेलसाठी नाव लागेल तिथं पाठवलं जाईल असं न्यायाधीश प्रशांत सित्रे यांनी स्पष्ट केलं.


Sachin Vaze Case: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि माझ्या मुलींची शपथ घेऊन सांगतो हे खोटं आहे : अनिल परब


सचिन वाझेंचा कोर्टाला पत्र देण्याचा प्रयत्न
बुधवार कोर्टातील सुनावणी संपायच्यावेळी आणखीन एक नाट्य पाहायला मिळालं. सचिन वाझेंनी कोर्टाला स्वत:च्या हातानं लिहिलेलं एक पत्र देण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोर्टानं हे पत्र स्वीकारण्यास नकार दिला. जर तुम्हाला काही सांगायचंय तर कलम 162 नुसार आरोपींना दिलेल्या नियमांनुसार आपलं म्हणणं मांडण्याचे निर्देश दिले. या पत्रात वाझेंनी राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्याबाबत काही गौप्यस्फोट केलेत. ही माहिती समजताच अनिल परब यांनी तातडीनं पत्रकार परिषद घेत या पत्रातले सारे आरोप फेटाळून लावत असल्याचं जाहीर केलं.