Mansukh Hiren | मृतदेह सापडल्याच्या 12 ते 24 तास आधीच हिरेन यांचा मृत्यू; Post Mortem अहवालात समोर
मुंबई : मनसुख हिरेन यांचा शवविच्छेदन अहवाल एबीपी माझाच्या हाती लागला आहे. हिरेन मृतदेह सापडल्याच्या 12 ते 24 तास आधी त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या शरीरावर कोणत्याही मोठ्या जखमा नाहीत. परंतु अहवालात मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तसंच कोणत्याही घातपाताचा उल्लेख या शवविच्छेदन अहवालात नाही.
त्यांच्या शरीराचे कोणत्याही अवयवांना दुखापत झालेली नाही, असंही शवविच्छेदन अहवालात म्हटलं आहे. मृत्यूचं नेमकं कारण हे केमिकल अॅनासिसिसनंतर समोर येणार आहे. त्यांचा मृत्यू बुडून झाला की हा घातपात हे केमिकल अॅनासिसिसमधून स्पष्ट होईल. मनसुख हिरेन यांच्या चेहऱ्यावरील जखमांवरुन काही प्रश्न उपस्थित होत आहेत. शवविच्छेदन अहवालाता मृत्यूचं प्राथमिक कारण समोर येईल अशी अपेक्षा होती. परंतु अहवालात मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
दरम्यान शवविच्छेदन अहवालाशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका मनसुख हिरेन यांच्या कुटुंबांने घेतली होती. त्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त अविनाश अंबुरे पीएम रिपोर्ट घेऊन त्यांच्या घरी पोहोचले.